You are currently viewing कंपोस्ट मातीला सक्षम बनवा
कंपोस्ट

कंपोस्ट मातीला सक्षम बनवा

कंपोस्ट खत घरच्या घरी कसे बनवायचे-compost khat
बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर जसा परिणाम होत आहे, त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजूला कमी झालेल्या जमिनीचा कसही याला कारणीभूत आहे. संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता यामुळे शेतकरी हंगामांमध्ये एकापेक्षा जास्त एकापाठोपाठ पिके घेत आहे, त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने हजारो जमिनी क्षारपड झाल्या आहेत. अशा मानवनिर्मित समस्या सोडवण्या साठी उपाय योजना करावी लागणार आहेत. जमिनीचा कस टिकवण्या साठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते.शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकांचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जीवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय. कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांपासून सूक्ष्म जीवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय.

कंपोस्ट खताचे घटक

पूरक पदार्थ (माती, जिप्सम, गवत) मातीत जर चुना आणि डोलोमाईट (२%) असेल तर नत्राचा ४०% नाश होतो, तेव्हा जमिनीत चुना किंवा डोलोमाईट टाकू नये.

सेंद्रिय पदार्थ

सकस कंपोस्ट बनवण्या साठी सेंद्रिय कचऱ्याची प्रत चांगली असावी लागते. सकस कचऱ्यात कर्ब-नत्र याचे प्रमाण ३० : १ असे पाहिजे. याचा अर्थ असा की जीवाणूंना त्यांच्या वाढीकरिता ३० भाग कर्ब व १ भाग नत्र लागतो.

वेगवेगळ्या पदार्थांत कर्ब-नत्र यांचे प्रमाण खालील प्रमाणे असते

  • कापलेले गवत २० : १
  • कागद १७ : १
  • लाकडाचा भुसा ४५ : १
  • भुईमूग (काड) १० : १
  • गुरांचे शेण १.२ : १
  • पालापाचोळा ६० : १

कर्ब:नत्र प्रमाण ३०% पेक्षा कमी असेल तर अमोनियाच्या रूपात नत्र नष्ट होते. जमिनीतील मुरुमाचे बारीक कण अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन होण्यास त्यांचे बारीक तुकडे करून कंपोस्ट करण्या करिता वापरावेत. लाकडाचा भुसा वर दिलेल्या प्रमाणात टाकावा.

जीवाणू

सेंद्रिय पदार्थ कुजवण्या साठी अनेक प्रकारचे जीवाणू कार्यरत असतात. त्यात बुरशी, बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसेट, प्रोटोझोआ इत्यादींचा समावेश होतो.

पाणी

कंपोस्टच्या खड्डयात ५० ते ५५ टक्के ओलावा असावा. पाण्याचा ओलावा कायम राहण्या साठी नेहमी पाणी शिंपडावे.

प्राणवायू

जीवाणूंच्या कार्यासाठी प्राण वायू असणे गरजेचे असते, म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे विघटन चांगले होते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास कार्यरत असलेले जीवाणू दोन प्रकारचे असतात

  • प्राणवायू घेऊन जगणाऱ्या जीवाणू द्वारे होणारे विघटन.
  • प्राणवायू शिवाय जगणाऱ्या जीवाणू द्वारे होणारे विघटन

प्राण वायू घेऊन जगणारे जीवाणू सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन करतात. परंतु जर त्यांना पुरेसा प्राणवायू मिळाला नाही तर प्राणवायू न घेणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढते व या जीवाणूंच्या प्रक्रियेने कंपोस्ट खतास वास येतो.

कंपोस्ट खतास वास येऊ नये म्हणून कंपोस्ट खड्ड्यात योग्य प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होण्या करिता योग्य व्यवस्था करावी लागते. (कंपोस्ट काही कालानंतर खालचे वर वर खाली करावे.)

कंपोस्ट खत तयार करताना होणारे बदल

तापमानातील बदल

सेंद्रिय पदार्थांचे जीवाणूंद्वारे विघटन होत असताना पुढीलप्रमाणे तापमानात बदल होतात. कंपोस्टच्या खड्ड्या तील तापमानाचे निरीक्षण केल्यास कमी तापमान, जास्त तापमान, खूप जास्ती तापमान, खूप कमी तापमान, असे बदल आढळून येतात. लहान आकाराचा खड्डा (२.५ मी व १.५ मी उंच व लांबी आवश्यकतेनुसार ) असल्यास त्याचे तापमान ५५ ते ६०° से. पर्यंत व त्यापेक्षा मोठ्या खड्डयात कंपोस्ट तयार केल्यास त्याचे तापमान ६० से. पेक्षा जास्ती होते.

सामू (pH) मधील बदल

प्रक्रियेत तयार होणाऱ्या आम्ल किंवा विम्ल यामुळे सामू बदलत जाऊन शेवटी ६ ते ८ च्या दरम्यान स्थिर होतो.

जीवाणूंचे बदल

४० ते ६०° से. या तापमानात थरमोफिलिक जीवाणू व बुरशी कार्यक्षम असतात. २० ते ४०° से. या तापमानात मेझोफिलिक जीवाणू कार्यक्षम असतात.

कंपोस्ट खतातील नत्राचे वितरण

वरील नत्र वितरणाच्या नैसर्गिक व्यवस्थेप्रमाणे पिकांना केवळ १७% नत्र पहिल्या हंगामात कंपोस्ट दिल्या नंतर मिळते. व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास पिकांना ५०% पर्यंत नत्र मिळू शकते.

कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती

पारंपरिक कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती

पारंपरिक कंपोस्ट (Conventional) पद्धती

पावसापासून खताचे संरक्षण होईल अशी जागा निवडा. पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे खत आणि टाकाऊ पदार्थ जमा करा. वर नमूद केलेल्या पदार्थांचा १५ सेंमी थर सर्वात खाली पसरवा. शेणखताचा ८ सेंमी जाडीचा दुसरा थर पहिल्या थरावर पसरवा. ३ सेंमी जाडीचा चांगल्या मातीचा थर दुसऱ्या थरावर पसरवा. ढिगाची उंची जोपर्यंत १.५ मीटर होत नाही, तोपर्यंत वरील क्रमवारीनुसार थरांची रचना करत जा. तयार होणाऱ्या ढिगाला नियमित पाणी घाला, ढीग सर्व बाजूंनी भिजेल एवढेच पाणी द्या. तीन आठवड्याने फावड्याच्या साहाय्याने ढीग खालीवर करा. त्यानंतर परत पाच आठवड्यांने ढीग खालीवर हलवा. तीन ते पाच महिन्यांत खत तयार होईल. नंतर ते शेतीसाठी वापरा.

चौदा दिवसांत कंपोस्ट पद्धती

वाळलेल्या / हिरव्या वनस्पतीच्या फांद्या, पालापाचोळा इत्यादी बारीक करून घ्या. ताज्या शेणासोबत वरील पदार्थ चांगले मिसळून घ्या. एकत्र केलेल्या पदार्थांचा १ मी X १ मी. x १ मी आकाराचा ढीग तयार करा. ढिगाची उंची १ मीटरपेक्षा जास्त नको. ढीग केळीच्या पानांनी किंवा फाटलेल्या पोत्याने किंवा ताडपत्रीने झाका. चार दिवसां नंतर ढिगाचा आतील भाग गरम होईल. जर हा भाग गरम झाला नसेल तर त्यात खत मिसळा. त्याच दिवशी ढीग अशा प्रकारे खालीवर करा की ढिगाचा आतील भाग बाहेर येईल व बाहेरचा आत जाईल. त्यानंतर प्रत्येक दोन दिवसांनंतर ढीग खालीवर करा. १४ ते १८ दिवसांत खत वापरण्यासाठी तयार होईल.

तीन कप्प्यात कंपोस्ट पद्धती

शेतावर बांबूच्या कामट्या किंवा इतर साहित्याच्या साहाय्याने कप्प्यांची आयताकृती तयार करा. आयताकृतीचा आकार ५ x १.५ x १.५ मीटर असायला हवा. पहिल्या कप्प्यात पालापाचोळा, गवत, झाडांचे तुकडे भरा. थोडी माती किंवा प्राण्यांचे खत मिसळा. पहिला कप्पा पूर्ण भरा. एका महिन्या नंतर पहिल्या कप्प्यातील कंपोस्ट फावड्याच्या साहाय्याने दुसऱ्या कप्प्यात भरा. खालीवर करून एकजीव करा. दुसऱ्या कप्प्यावर माती टाका आणि ती सतत ओलसर व मोकळी राहील याची काळजी घ्या. रिकामा झालेला पहिला कप्पा लगेच पूर्वीप्रमाणे भरून घ्या. जेणेकरून कंपोस्ट तयार करण्याची क्रिया सतत सुरू राहील. परत एक महिन्या नंतर दुसऱ्या कप्प्यातील कंपोस्ट काढून तिसऱ्या कप्प्यात भरा. त्याला पूर्णपणे हवा लागू द्या. नंतर झाकून टाका. एका महिन्याने हे कंपोस्ट शेतीसाठी वापरा.

सेमी संकन कंपोस्ट पद्धती

कंपोस्ट खत तयार करण्यासाठी जागा निवडा. ती स्वच्छ करा आणि तिथे अर्धा मीटर खोल खड्डा तयार करा. कंपोस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे लहान लहान तुकडे करा व ते ५:१ या प्रमाणात खताबरोबर मिसळा. वरील साहित्य खड्डयात भरा. जमिनीपासून ढीग १ ते २ मीटर उंचीचा होईपर्यंत साहित्य भरत राहा. त्या ढिगाला हाताने किंवा फावड्याच्या साहाय्याने चौकोनी आकार द्या. ढीग माती आणि भुश्याच्या मिश्रणाने लिंपा. त्यावर मातीचा थर टाका आणि त्याला लाकडाच्या साहाय्याने लहान लहान छिद्रे पाडा. १ ते २ खत महिन्यांत तयार होईल.

टोपली कंपोस्ट पद्धती

या पद्धती मध्ये घरातील कुजण्या सारखे पदार्थ, बगिचा किंवा शेतातील टाकाऊ पदार्थ आणि द्विदल धान्यांचा पालापाचोळा टोपलीत कुजू देतात. टोपलीतील पदार्थ अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असताना टोपली बागेत गाडून ठेवतात.

इंदौर पद्धत

इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, काडीकचरा, शेण, तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवला जातो. ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर (ऑक्‍सिजनयुक्त) लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर-खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात. तसेच ओलावा टिकविण्याकरिता पाणी शिंपडले जाते. याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते. 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते. या खतामध्ये 0.8 ते 1.5 टक्के नत्र, 0.5 ते 1 टक्का स्फुरद व 1 ते 1.8 टक्के पालाश मिळून इतर अन्नघटक असतात.

बंगलोर पद्धत

बंगलोर पद्धतीलाच खड्डा पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर 15 ते 20 सें. मी. जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो. अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण करून लिंपून घेतले जाते. सेंद्रिय पदार्थांची कुजवण्याची क्रिया लवकर होण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडले जाते. कुजण्याची क्रिया सुरवातीला ऑक्‍सिजनविरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास वेळ लागतो. या पद्धतीमध्ये अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.

नॅपेड पद्धत

ही पद्धत पुसद येथील एक गांधीवादी शेतकरी कै. नारायण देवराव पांढरीपांडे यांच्या प्रयोगातून विकसित केली आहे. या पद्धतीत जमिनीवर पक्‍क्‍या विटांच्या साह्याने 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच अशा आकाराचे टाकीचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळींनंतर तिसऱ्या ओळीत खिडक्‍या ठेवल्या जातात. या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, 100 कि. ग्रॅ. शेण, दीड टन चाळलेली माती भरली जाते. नॅपेड पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात. त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते. यानंतर साधारणतः 1 ते 2 इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर अर्धा देऊन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो. अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यांत उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.

लेख संकलित आहे

संकलन
हर्षल राजपूत, शिरपूर

Leave a Reply