जमिनीची सुपीकता – वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता व जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असून, जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत वापराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतीत सेंद्रिय पदार्थाचा पुरेसा वापर होत नाही. सध्या कंपोस्ट खत, शेणखत व हिरवळीची खते फक्त बागायत शेतीतच वापरली जातात. त्यामुळे कोरडवाहू शेतीत ओलाव्याच्या कमतरतेबरोबर अन्न द्रव्याचा तुटवडा भासत आहे. पिकांची उत्पादकता कमी होत आहे. यावर उपाय म्हणून कोरडवाहू पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे.
सेंद्रिय खताची निर्मिती प्रामुख्याने वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून होते. यामध्ये सर्वसाधारणपणे साखर कारखान्याची मळी, शेतातील टाकाऊ पीक अवशेष, कुकुटपालनातील टाकाऊ पदार्थ, जनावरांच्या दावणीतील टाकाऊ पदार्थ आणि पालापाचोळा इत्यादी घटकाचा समावेश होतो. हे सेंद्रिय पदार्थांची कुजवून अन्नद्रव्ये विघटित करून शेतात वापरावे लागतात. सेंद्रिय खत वापरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.
पीक उत्पादना मध्ये जमिनीची सुपीकता, पाणी आणि हवामान या तीन नैसर्गिक घटकांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांचे व्यवस्थित संवर्धन करताना शाश्वत आणि दीर्घकालीन विचार करण्याची आवश्यकता आहे. जमिनीची सुपीकता या बाबत केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक सेंद्रिय रासायनिक पद्धतींचा अवलंब केल्यास खर्चात बचतीसोबतच पिकांचे चांगले उत्पादन मिळवणे शक्य होणार आहे.
Table of Contents
पहिला पाऊस पडल्या वर येणारा मातीचा सुगंध हा उन्हाळ्यात सुप्तावस्थेत असलेल्या ॲक्टीनोमायसिट्स या सूक्ष्म जिवाणूंना पावसाची ओल मिळल्यामुळे येतो. हे जिवाणू जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या कुजविण्याची क्रिया सुरू करतात. त्यातून जिओस्मिन २ मिथिल आयसोबोर्निओल हा सुगंधित वायू बाहेर पडतो. अशाच प्रकारे जमिनीत असंख्य प्रकारचे सूक्ष्म जिवाणू वेग वेगळे काम करत असतात. त्यातील महत्त्वाचे काम म्हणजे वनस्पतींना किंवा पिकांना मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणे होय. मात्र अधिक उत्पादनाच्या लालसेने आपण रासायनिक खते, पाणी यांचा असंतुलित वापर करतो. जमिनी मध्ये आवश्यक तितके सेंद्रिय आणि जैविक घटकांची पूर्तता आपण करत नाही. सेंद्रिय पदार्थ हेच सूक्ष्म जिवाणूंचे अत्र आहे. तेच नसल्या मुळे अनेक जमिनी या जिवाणूरहित म्हणजे मृतप्राय अवस्थेकडे जात आहेत.
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची उपलब्धता न करताच केवळ रासायनिक खतांचा वापर वाढवणे अतिशय चुकीचे आहे. रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच पर्याय होऊ शकत नाहीत. सेंद्रिय खतामध्ये सर्व अन्नद्रव्ये ही अल्प प्रमाणात असतात. मात्र त्यात सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात असते. उदा. एक टन शेणखतापासून नत्र ५.६ किलो स्फुरद ३.५ किलो पालाश १७.८ किलो, गंधक १ किलो, मंगल २०० ग्रॅम, जस्त ९६ ग्रॅम, लोह ८० ग्रॅम, बोरॉन २० ग्रॅम, १५.६ ग्रॅम तांबे, २.३ ग्रॅम मोलाब्द इ. अन्नद्रव्ये असतात. मात्र त्यापासून अनेक महत्त्वाची विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके आणि जीवनसत्त्वे मिळत असल्याने पीक उत्पादनाचा दर्जा वाढतो. उदा. गोडी, रंग, रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मा मध्ये लक्षणीय सुधारणा होते. जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादकता या दोन्ही गोष्टी वाढतात.
उत्पादक जमीन ही निश्चितच सुपीक असते, मात्र सुपीक जमीन उत्पादक असेलच असे नाही.
याचे कारण म्हणजे जमिनीने अत्रद्रव्यांचा पुरवठा केला म्हणून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. तर त्यासाठी जमिनीचे पायाभूत गुणधर्म, समस्यायुक्त जमिनी, पाणी, तण, रोग आणि कीड अशा अन्य व्यवस्थापनाचीही तितकीच गरज असते.
महाराष्ट्रातील हवेचे तापमान अधिक असल्याने वापरलेल्या सेंद्रिय खतांचे / पदार्थांचे विघटन खूप जलद गतीने होते. दरवर्षी सेंद्रिय खते वापरूनही अनेक वेळा सेंद्रिय कर्ब वाढल्याचे दिसत नाही. सेंद्रिय खतांचे विघटन हे तापमान, जमिनीतील ओलावा, प्राणवायू व जिवाणूंची संख्या यावर अवलंबून असते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी, जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढण्यासाठी व जिवाणूंची वाढ होण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा पुरेसा पुरवठा गरजेचा आहे.
सेंद्रिय खते शेतात टाकल्यानंतर ती बराच काळ उघड्यावर राहिल्यास त्यातील नत्राचा -हास होतो. खड्ड्यात सेंद्रिय खत तयार करताना खड्डा मातीने न झाकल्यासही नत्राचा -हास होतो. वापरलेल्या सेंद्रिय खतांचे जैविक आणि रासायनिकदृष्ट्या विघटन होते. त्याचा फटका त्यावर अवलंबून असलेल्या सूक्ष्म जिवाणूंना बसतो. त्यांची वाढ आणि संख्या कमी राहते. परिणामी, अशी खते वापरूनही अनेक वेळा अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.
जमिनीतील सूक्ष्म जिवाणू हे पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतात. म्हणजेच आपण वापरलेली रासायनिक खतातील अन्नद्रव्ये पिकांना पुरविण्याचे काम करतात. उदा. शेतामध्ये वापरलेल्या युरिया मधील नत्राचे रूपांतर जो पर्यंत नायट्रेट (NO3)मध्ये होत नाही, तोपर्यंत तो पिकांना शोषता येत नाही. हे रूपांतराचे काम नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे जिवाणू करतात. त्याच प्रमाणे वनस्पती स्वतःला लागणारी अन्नद्रव्ये हे सेंद्रिय स्वरूपात घेत नाहीत. सूक्ष्म जिवांकडून सेंद्रिय घटकाचे विघटन करून त्याचे रूपांतर खनिज (रासायनिक) स्वरूपात केल्यानंतरच त्या तील सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
जमिनीची सुपीकता व तिचे गुणधर्म
भौतिक गुणधर्म
जमिनीची घनता १.१ ते १.४ ग्रॅम / घन सेमी यादरम्यान असावी, त्यामुळे घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढवून हवा खेळती ठेवते.
जमिनीचा पोत हा पोयटायुक्त (गाळाची) किंवा
चिकन पोयटायुक्त असावी. जमिनीची जलधारण शक्ती चांगली असावी परंतु भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला असावा. मातीची रवाळ संरचना किंवा घडण मऊ / चांगली असावी. त्यामुळे मातीची धूप कमी होते व जमिनीची सुपीकता टिकून राहते.
जैविक गुणधर्म
सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंच्या जननक्रियेस गती प्राप्त होऊन त्यांच्या संख्येत वाढ होते. त्यांना जमिनी मध्ये उपलब्ध सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. त्यांची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते व जमिनीची सुपीकता वाढते. कर्ब : नत्र गुणोत्तर २०:१ असणाऱ्या जमिनीमध्ये साधारणपणे सूक्ष्मजीवांचा संख्या पुढील प्रमाणे असते. सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे (उदा. युरीएज, सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लीग्निनज, फॉस्फटेज, सल्फेटेज, प्रोटो पेक्टीनेज इ.) प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो व जमिनीची सुपीकता वाढते.
रासायनिक गुणधर्म
जमिनीचा सामू तटस्थ (६.५ ते ७.५) असावा. विद्युत वाहकता (क्षारता ) ०.१० ते ०.५० डेसीसायमन प्रति मीटरपर्यंत असावी. मुक्त चुनखडीचे प्रमाण ५ ते १० % पर्यंत (मध्यम) असावे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ % पेक्षा जास्त असावे. सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये नत्र (२८० किलो/हे. पेक्षा जास्त), स्फुरद (१५ किलो/हे. पेक्षा जास्त), पालाश (१५० किलो/हे. पेक्षा जास्त) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये उपलब्ध लोह (४.५ मिलिग्रॅम/ किलोपेक्षा जास्त), उपलब्ध जस्त (०.६ मिलिग्रॅम/ किलोपेक्षा जास्त), उपलब्ध बोरॉन (०.५ मिलिग्रॅम/ किलोपेक्षा जास्त) असावे.
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाय
पीक अवशेषांचे व्यवस्थापन करावे
शेतातील टाकाऊ पीक अवशेष जमिनीत गाडल्यामुळे व जमिनीची सुपीकता व जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोग होतो. पीक अवशेषांमध्ये पुष्कळ प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. या पीक अवशेषाची जमिनीत गाडणी केल्यामुळे, पिकांनी जमिनीतील घेतलेली तेवढी तरी अन्नद्रव्ये, जमिनीस परत केली जातात. पीक अवशेष जमिनीत गाडण्याच्या तंत्रामुळे शेतातील जागा असणारे पीक अवशेषाचे रूपांतर उपयुक्त घटकांत केले जाते. त्यामुळे पिकांची अन्नद्रव्याची गरज तर भागते. तसेच उभ्या पिकाच्या दोन्ही ओळीत पसरून आच्छादन म्हणूनसुद्धा चांगला उपयोग होतो. सेंद्रिय अवशेषांचा कार्यक्षमरीत्या वापर करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. परंतु यासाठी जादा नत्र अन्नद्रव्याची गरज, पीक अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तराचे प्रमाण कमी करण्यासाठी लागते. कर्ब – नत्राचे गुणोत्तराचे प्रमाण कमी केल्यामुळे शेतात गाडलेल्या पीक अवशेषांचे जैविक विघटन होऊन स्फुरद, पालाश व इतर असणारी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. या तंत्रामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीत सरी वरंबे तयार करावेत. त्यामध्ये सर्वसाधारणपणे हेक्टरी 5 टन या प्रमाणात टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचे 5-6 सें.मी. लांबीचे लहान लहान तुकडे टाकावेत. या सेंद्रिय पदार्थावर 100 किलो शेणखत व अर्धा किलो सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जीवाणू संवर्धकाचे 100 लिटर द्रावण करून सरीतील सेंद्रिय पदार्थावर टाकावे. नंतर रिझरच्या साह्याने वरंब्याचे रूपांतर सरीत करावे, असे केल्याने सरीतील पीक अवशेष वरंब्याच्या पोटात गाडले जातात. जमिनीतील पाण्याच्या ओलाव्यावर हे पदार्थ चांगले कुजतात व पुढील हंगामातील रब्बी पिकास उपयोगी पडतात व जमिनीची सुपीकता वाढते.
हिरवळीची खते वापरास प्राधान्य द्यावे
भारतामध्ये ताग, धैंचा, चवळी, मूग, उडीद यासारख्या हिरवळीच्या पिकाचा वापर खतासाठी केला जातो. ही हिरवळीची पिके रायझोबियम जीवाणूंच्या मदतीने वातावरणात 78 टक्के असणारे नत्र शोषून घेतात. पिकांच्या मुळावरील गाठीत हा नत्र साठविला जातो. हिरवळीच्या पिकामुळे शेतातील तणाची वाढ कमी होते. हिरवळीच्या खतामुळे जमिनीची कणरचना, पोकळपणा, जलधारणाशक्ती आणि जलवाहकता, घनता, इत्यादी गुणधर्मात सुधारणा होते व जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीवर पिकांची फेरपालट हंगामी फेरपालट पद्धतीतील द्विदलवर्गीय पिकाचा एक हंगामा करिता समावेश असतो तर दीर्घकाळ फेरपालट पीक पद्धतीत अनेक पिकांची ठराविक क्रमाने दीर्घकाळासाठी फेरपालट केली जाते. या पीक पद्धतीमध्ये पिकांच्या अवशेषामधून जमिनीत नत्र अन्नद्रव्याचा पुरवठा वाढविला जातो. उदा. उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, तूर, वाटाणा, गवार, मेथी, भुईमूग, हरभरा, ल्युर्सन, घेवडा आणि अल्फा या सारख्या हंगामी पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. या पिकापासून मानवी आहारासाठी आवश्यक असणारी प्रथिने धान्य उत्पादनातून मिळतात आणि या द्विदलवर्गीय पिकांचे अवशेष बेवड म्हणून जमिनीत गाडता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. द्विदलवर्गीय चारा पिकांची बेवड द्विदलवर्गीय पिकापेक्षा चांगला होतो. पुढील हंगामातील पिकास नत्र अन्नद्रवाचा पुरवठा होतो.
जिवाणू खताचा वापर करावा
जैविक नत्र स्थिरीकरण तंत्रामध्ये द्विदल वर्गीय पिकाच्या बियाण्यास रायझोबियम जिवाणूंची प्रक्रिया केली जाते. या पद्धतीमध्ये पाकिटातील जिवाणू खत पुरेशा पाण्यामध्ये गूळ टाकून चिकट द्रावण करावे, हे द्रावण बियाण्यास लावावे. साधारणपणे 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम जिवाणूंचे खताचे एक पाकीट पुरते. याशिवाय रोपाच्या मुळावर मुळावर जिवाणू खताचे आंतरक्षीकरण करावे. तसेच काही कारणामुळे जिवाणू खत बियाण्याला अगर रोपांना लावणे शक्य न झाल्यास जिवाणू खत अंदाजे 20 ते 25 किलो बारीक मातीमध्ये मिसळून हे मिश्रण पिकामध्ये हाताने टाकावे नंतर खुरप्याने जमीन हलवून पिकास पाणी द्यावे.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन व पुनर्वापर करावा
शेतामध्ये किती तरी सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. उदा. गवत, पालापाचोळा, पिकाचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे धान्य व्यतिरिक्त अवशेष भाग. या सेंद्रिय पदार्थापैकी काही पदार्थ लवकर कुजवून लगेच शेतात वापरता येतात. काहींना मात्र कुजण्यासाठी काही काळ लागतो. अशा सेंद्रिय पदार्थातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करण्यासाठी विघटन होणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
लेख संकलित आहे
संकलन
हर्षल राजपूत, शिरपूर