भुईमुग हे तीनही हंगामात घेतले जाणारे तेलबिया पिक आहे. उन्हाळ्यात तुलेनेने कमी क्षेत्र असूनही या कालावधीत असणारे निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने प्रति एकरी सरासरी उत्पादकता अधिक (५६० किलो प्रति एकर) आहे. भुईमूग या पिकापासून जनावरांना सकस चारा, खाद्यतेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की), सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळत असल्याने हे एक फायदेशीर पिक आहे.
Table of Contents
भुईमुग पिकासाठी जमीन निवड
भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. भारी व चिकणमाती युक्त जमिनीत आऱ्या खोलवर जात नाहीत, शेंगा पोसत नाहीत. तसेच काढणीच्या वेळी ओलावा कमी असल्यास शेंगा जमिनीतच राहून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
अनुकूल हवामान
भुईमुग पिकवाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान उपयुक्त असते. बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीसाठी जमिनीतील तापमान १५ अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. फुलधारणेसाठी वातावरणातील तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस तापमान मानवते. वातावरणातील तापमान सतत ३३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहिल्यास पराग कणांच्या सजीव क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन फुलांमध्ये वांझपणा येऊन शेंग धारणा होत नाही. तर जमिनीतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस मध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फूलधारणा ते पक्वता या कालावधीत जमीन व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्या संख्येत घट होते.
जमिनीची पूर्वमशागत
भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असावी. जमिनीची खोल (१५ सें.मी.) नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.
पेरणीची वेळ
काही शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामात भुईमुग लागवडीसाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे. वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर पेरणीस सुरवात करावी…
- खरीप – १५ जून ते १५ जुलै
- उन्हाळी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
बियाणे
भुईमूगाचे वाण निहाय बियाणे प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे वापरावे.
१०० किलो
- एसबी – ११
- टीएजी – २४
- टीजी – २६
- जेएल – ५०१
- फुले ६०२१
१२० ते १२५ किलो
- फुले प्रगती
- फुले व्यास
- टीपीजी – ४१
- फुले उनप
- फुले उन्नती
बीजप्रक्रीया
पेरणी साठी निरनिराळ्या वाणाच्या (दाणे) जाडीप्रमाणे हे जीवाणू संवर्धन पुरेशा पाण्यात मिसळून त्याचे गाढ द्रावण तयार करावे. हे द्रावण आवस्थेत येणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्या साठी पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम हळुवार पणे अशा पद्धतीने लावावे की बियांवर सारख्या प्रमाणात लेप बसेल स्वच्छ जागेवर सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी. बियाणे सावलीत सुकवून ठेवावे. साधारणपणे १० किलो बियाणाला २५० ग्रॅम चे जीवाणू खताचे एक पाकीट पुरते.
रायझोबियम जीवाणु मुळे होणारे फायदे
- बियाणांची उगवण लवकर व चांगल्या प्रमाणात होते.
- जीवाणू खतांच्या वापरा मुळे पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपांची वाढ जोमदार होते.
- जीवाणूंनी जमिनीत सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्या मुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
- जमिनीचा पोत सुधारतो.
- पिकाचे उत्पन्न १० ते १५ टक्क्यांनी वाढते.
पेरणी अंतर
उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची पेरणी पाणी देऊन, जमीन वाफसा आल्यानंतर व शक्यतोवर टोकण पद्धतीने करावी. पेरणी योग्य वेळेवर व योग्य खोलीवर करावी.
पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. ठेवून भुईमुगाची पेरणी करावी. उपट्या व निम पसऱ्या जाती साठी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १५ सें.मी. ठेवावे. पेरणीनंतर बियाणे मातीने चांगले झाकून घ्यावे. त्यामुळे पक्ष्यां पासून संरक्षण होऊन झाडांची संख्या गरजे प्रमाणे ठेवता येईल.
खत मात्रा
पुर्व मशागतीच्या वेळी
शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी २० गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
पेरणीच्या वेळेस खत व्यवस्थापन (शिफारशीनुसार )
- ४० किलो युरिया अधिक २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा
- १०० किलो सुफला (२०:२०:०) अधिक १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा
- १०० किलो डायअमोनिअम फॉस्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
जमिनीत स्फुरदाचे प्रमाण हेक्टरी १० किलोपेक्षा कमी असेल, तर स्फुरदाची मात्रा हेक्टरी ६० किलो द्यावी.
सूक्ष्म अन्नद्रव्य चुना व गंधक (जिप्सम) चा पुरवठा
भुईमुगाचे अधिक उत्पन्न मिळण्या साठी जमिनीत योग्य प्रमाणात चुना व गंधक असणे आवश्यक आहे. जिप्सम मधून २४ टक्के कॅल्शियम व १८.६ टक्के गंधक उपलब्ध होतो. म्हणून ५०० किलो जिप्सम प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर २० दिवसांनी दोन समान हप्त्यात झाडाच्या लगत पेरून द्यावे. त्यामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
आंतरमशागत
पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ निंदण्या (खुरपण्या) द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमूगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये.
तण व्यवस्थापन
भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापना करिता पेरणीनंतर लगेच Pendimethalin -१.०० किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातुन ओलीवर फवारणी करावी. तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी इमॅझिथायपर १० टक्के एस एल ०.०७५ कि.क्रि. हा/हे. (७५० मिली व्यापारी उत्पादन/हे) ५०० लिटर पाण्यातून द्यावे.
पाणी व्यवस्थापन
खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पाण्याची पाळी द्यावी. भुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.
पीक सरंक्षण
फुलकिडे, तुडतुडे नियंत्रणासाठी
- Fipronil ४०%+Imidacloprid ४०%- १ ग्रॅम प्रति लिटर किंवा
- Demeton १५% – १-२ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी नियंत्रणासाठी
- Chloro ५०%+Cypermethrin ५% E.C – १-२ मिली प्रति लिटर किंवा
- Emamectin benzoate ५% S.G – १-१.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा
- Quinalphos २५% E.C – १-२ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास
- Carbendizm१२%+Mancozeb ६३% – २-३ ग्रॅम प्रति लिटर किंवा
- Metalaxyl ३५%- २-३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी
- Carbendizm१२%+Mancozeb ६३% – २५०-५०० ग्रॅम प्रति एकर किंवा
- Metalaxyl ३५%- २५०-५०० ग्रॅम प्रति एकर द्यावे.
काढणी व उत्पादन
पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर वरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास
- खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर
- उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.
माहिती स्रोत
- कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
- संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती
संकलन
हर्षल राजपूत , शिरपूर..